वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचा ‘पीपीपी’ने विकास
By Admin | Published: March 17, 2015 01:04 AM2015-03-17T01:04:29+5:302015-03-17T01:04:29+5:30
रेल्वे - राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून पीपीपी मॉडेलच्या आधारे जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार विजय दर्डा यांना दिले.
रेल्वेमंत्र्यांचे दर्डा यांना आश्वासन : ‘रेल्वे म्युझियम-रेल्वे उद्यान’ मार्गी
नवी दिल्ली : विदर्भ - मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग रेल्वे - राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून पीपीपी मॉडेलच्या आधारे जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार विजय दर्डा यांना दिले.
रेल्वेमंत्री प्रभू यांची खा. दर्डा यांनी सोमवारी संसद भवनात भेट घेतली. त्यात वर्धा-यवतमाळ-नांदेड व यवतमाळातील २२ एकर परिसरात ‘रेल्वे म्युझियमसह - रेल्वे उद्यान’निर्मितीच्या प्रगतीबाबत चर्चा झाली. प्रभू यांनी ग्रामीण भागातील रेल्वेचे जाळे मजबूत करण्याचे आश्वासन दर्डा यांना दिले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग दोन प्रादेशिक विभागांना जोडणारा असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ- मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने या रेल्वेमार्गाला प्राधान्य दिल्याचे तसेच त्यापूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मार्गाचा प्राधान्यक्रम निश्चित केला होता, असे खा. दर्डा यांनी सांगितले तेव्हा, जलदगतीने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रभू यांनी दिली.
खा. दर्डा यांनी या रेल्वेमार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दलही कल्पना देताना रेल्वेमंत्र्यांना सांगितले, यवतमाळ हा आदिवासीबहुल मागास जिल्हा आहे. हा मार्ग पूर्ण झाला तर विदर्भ व मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळेल. पण आताच्या गतीने निधी मिळाला तर अजून १०८ वर्षे हा मार्ग होणार नाही अशी चिंता खा. दर्डा यांनी व्यक्त केली, तेव्हा प्रभू यांनीही यामध्ये गंभीरपणे लक्ष घालू असे मत व्यक्त केले. यवतमाळातील २२ एकर परिसरात ‘रेल्वे म्युझियमसह - रेल्वे उद्यान’ हा इको उद्यान प्रकल्प शक्य तेवढ्या गतीने पूर्णत्वास नेण्याच्या सूचना प्रभू यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. या उद्यानाचे भूमिपूजन माजी रेल्वेमंत्र्यांनी २०१४मध्ये केले.
खा. दर्डा म्हणाले, मंत्री बदलले तरी धोरण बदलू नये. किंबहुना उद्यान विकसित करण्यासाठी डब्लूसीएलचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा यांच्याशी चर्चा झाली असून, खासदार निधीतून १ कोटी देण्याची तयारी दर्डा यांनी दर्शविली. या जागेवरील अतिक्रमणे दोन वेळा काढली, असे सांगून रेल्वे बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाचे सदस्य सुबोध जैन यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई येथील महाव्यवस्थापकांशी याबाबत पत्रव्यवहारही केल्याचे दर्डा यांनी सांगताच प्रभू यांनी विनाविलंब उद्यान मार्गी लागेल अशी हमी दिली. (विशेष प्रतिनिधी)
रेल्वेमंत्र्यांना निमंत्रण
रेल्वे व अभियांत्रिकी यांचा विलक्षण संबंध लक्षात घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे व्याख्यानासाठी खा. दर्डा यांनी निमंत्रित केले असून, या विनंतीला प्रभू यांनी होकार दिला आहे.