देवेन भारती की संजय भाटिया? कोण मारणार बाजी...तु म्ही निवडा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर

By admin | Published: March 22, 2016 04:02 AM2016-03-22T04:02:30+5:302016-03-22T04:02:30+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी प्रशासन विभागात अजय मेहता, भूषण गगराणी, देवेन भारती, नितीन करीर, संजय भाटिया यांची नामांकने जाहीर झाली आहेत.

Deven Bharti's Sanjay Bhatia? Who's going to win ... you choose Lokmat Maharashtrian's of the Year | देवेन भारती की संजय भाटिया? कोण मारणार बाजी...तु म्ही निवडा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर

देवेन भारती की संजय भाटिया? कोण मारणार बाजी...तु म्ही निवडा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर

Next

मुंबई:  या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या पुरस्काराची परंपरा (इथे क्लिक करुन तुम्ही तुमचे मत नोंदवा) आता सिद्ध  होऊ पाहात आहे. 

यंदाच्या तिसऱ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. या प्राथमिक निवडीतून अंतिम विजेते निवडण्याचा मान आहे तुमचा!
तर आपलं बहुमूल्य मत बनवण्यासाठी करा इथे क्लिक

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी प्रशासन विभागात (राज्यस्तर) अजय मेहता, भूषण गगराणी, देवेन भारती, नितीन करीर, संजय भाटिया यांची नामांकने जाहीर झाली आहेत. या वर्षी पहिल्यांदा ‘प्रशासन’ असा विभाग करण्यात आला असून, त्यातही विभागीय आणि राज्यस्तरीय असे दोन भाग करण्यात आले आहेत. राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे... असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगायचे. राज्यकर्त्यांनी कितीही चांगल्या कल्पना रंगवल्या आणि अधिकाऱ्यांनी त्या राबवल्याच नाहीत, तर कोणत्याही योजना कधी यशस्वी होऊ शकत नाहीत, असे ते म्हणायचे. ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळाने अशीच नाही म्हणणाऱ्या काही चांगल्या अधिकाऱ्यांची निवड केली. ‘प्रशासन’ : या विभागासाठी. नामांकने आणि त्यांची माहिती अशी :
अजय मेहता, मुंबई पालिका आयुक्त
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक महत्त्वाचे बदल घडवले. मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते व पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी कार्यवाही करणे, मुंबई स्वच्छ व सुंदर कशी दिसेल, यासाठी वेगवेगळ्या योजना राबविणे, महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या बांधकामविषयक, तसेच आरोग्यविषयक परवानग्यांची संख्या कमी करण्यासोबतच, प्रक्रियांचे सुलभीकरण करणे, आदींचा सहभाग आहे. काम न करणारे अधिकारी असोत वा कंत्राटदार, त्यांच्यावर वचक बसविण्यात ते यशस्वी ठरले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कंत्राटदारांना जेलची हवादेखील खावी लागली. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे आयुक्त, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे मात्र,
खंबीरपणे उभे राहत असल्याचेदेखील मुंबईने अनुभवले.

भूषण गगराणी, सीईओ, एमआयडीसी
सध्या एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मराठी साहित्य हा विषय घेऊन आयएएसची परीक्षा मराठीत देणारे गगराणी हे पहिले अधिकारी. ज्या काळात इंग्रजीची भीती असायची, त्या वेळी त्यांनी भाषेचा न्यूनगंड घालवण्याचे काम केले. त्यामुळे भाषेच्या भीतीतून विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांच्यानंतर अनेक मराठी तरुण आयएएस झाले, या स्पर्धा परीक्षेकडे वळाले. गगराणींचे लो प्रोफाइल राहून काम करणे म्हणूनच उठून दिसते. कधीही टेबलवर फाइल पेंडिंग न ठेवणारे, अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि गेल्या तीन वर्षांत उद्योग क्षेत्राला आलेली सरकारी मरगळ झटकून टाकण्यासाठी त्यांनी केलेले काम नोंद घेण्याजोगे आहे. ६ हजार हेक्टर जमीन कोणताही गाजावाजा न करता संपादित करण्याचे काम त्यांनी केले. एमआयडीसीच्या परवान्यांची संख्या १५ वरून त्यांनी ५ वर आणली. उद्योगांना पुण्या-मुंबईच्या बाहेर नेण्याचे कामही त्यांनी केले.

देवेन भारती, सहपोलीस आयुक्त, मुंबई
मुंबईत सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर असणाऱ्या भारती यांनी गणेशोत्सव व बकरी ईद, दुर्गापूजा व मोहरम आणि ख्रिसमस व ईद-ए-मिलाद हे सण एकाच वेळी आले व शांततेत साजरे झाले. हेमा उपाध्याय खून खटल्यासह सर्व प्रमुख गुन्ह्यांचा छडा लागला. खंडणीच्या गुन्ह्यात कुख्यात गुंड अश्विन नाईक यास मोक्कांतर्गत अटक करण्यात आली. वाढता कट्टरतावाद रोखण्यासाठी सरकारने तयार केलेल्या कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी योगदान दिले. इंडियन मुजाहिद्दीनची राज्यातील पाळेमुळे खणून काढत, मुजाहिद्दीनच्या २१ हून अधिक सदस्यांना त्यांनी अटक केली. अ‍ॅडव्होकेट
शाहिद आझमी व गँगस्टर फरीद तानाशा
यांच्यावर अंडरवर्ल्डच्या हल्ल्याचा छडा भारती यांनी लावला.

नितीन करीर, प्रधान सचिव, नगर विकास
एमएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर न होता, ग्रामीण, आदिवासी भागात जाऊन सेवा करण्याची इच्छा ठेवणारे, वैद्यकीय व्यवसाय न करता, प्रशासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहणारे मूळचे पंजाबी असलेले नितीन करीर करिअर निवडतानाच वेगळे ठरतात. सरकारमध्ये उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळण्यासाठी तुमची कार्यक्षमताही महत्त्वाची असते. या कार्यक्षमतेमुळेच ते नगरविकास खात्याचे प्रधान सचिव पदापर्यंत पोहोचले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व पातळ्यांवर काम करावे लागते. पुणे आणि सांगलीचे जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिका आयुक्त, महसूल आणि वनखात्यात काही काळ आणि २00९ साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्या कार्यालयात त्यांनी काम केले आहे.

संजय भाटिया, एमडी, सिडको
भ्रष्टाचाराविरोधी लढाई असो, ग्रामीण भागातील प्रशासन बळकट करणे असो, ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक वापर असो, विक्री करामार्फत राज्याचा महसूल वाढवून देणे असो वा नवी मुंबई मेट्रो आणि विमानतळ प्रकल्प मार्गी लावण्याचे काम असो, ज्या-ज्या ठिकाणी संजय भाटिया यांची नियुक्ती झाली, तिथे-तिथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नवी मुंबई विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्यांसाठीचा नैना प्रकल्प, सिडकोत सर्वप्रथम बोकाळलेल्या भ्रष्टाचारास वेसण घालून पारदर्शकता आणली. यामुळे ‘सडकी सिडको’ अशी इमेज दूर झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून हा विषय मार्गी लावला. सिडकोच्या इतिहासातील साडेबारा टक्के भूखंड योजनेचे संपूर्ण रेकॉर्ड स्कॅन करून त्याचा संगणकीय डाटा तयार केला. सर्व नामांकनांचा क्रम
इंग्रजी आद्याक्षरानुसार

Web Title: Deven Bharti's Sanjay Bhatia? Who's going to win ... you choose Lokmat Maharashtrian's of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.