Devendra Fadanvis: 'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:30 PM2022-07-15T17:30:45+5:302022-07-15T17:35:55+5:30
'नामांतराच्या निर्णयाला आमचा विरोध नाही, गेल्या सरकारच्या कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही.'
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अखेरच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या तीन महत्वाच्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. पण, आता या निर्णयांना स्थगिती दिली नसल्याची स्पष्टोक्ती स्वत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद(Aurangabad), उस्मानाबाद (Osmanabad) आणि नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली.
'...तेव्हा कॅबिनेटला निर्णय घेता येत नाही'
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''आमच्या सरकारने त्या निर्णयांना स्थगिती दिलेलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता. नियम आणि परंपरा अशी आहे की, ज्यावेळी राज्यपाल विश्वादर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही कॅबिनेट निर्णय देता येत नसतो. एखाद्या सरकारला राज्यपाल सांगायचे, तुमचे बहुमत सिद्ध करा, तेव्हा ते कॅबिनेट बोलावून विधानसभा भंग करण्याचा निर्णय घ्यायचे. त्यामुळेच अशाप्रकारचा नियम आणला गेला.''
'आमचा या निर्णयांना पाठिंबा'
''औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव, हे ठराव चुकीच्या पद्धतीने केले गेले. त्यांचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होतं, तेव्हा यांनी या विषयात हात घातला नाही. पण, जेव्हा यांनी बहुमत गमावलं, तेव्हा अखेरच्या क्षणी त्यांच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला. या निर्णयाला आमचाही पाठिंबा आहे, पण आता जे सरकार बहुमतात आहे, ते याबाबत निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले की, ही नावे महत्वाची आहेत, अस्मितेची आहेत. कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नयेत. ज्यांचे सरकार आहे, त्यांच्या बैठकीत ही ठेवण्यात यावीत. त्यामुळे आमच्या कॅबिनेटसमोर ही नावे ठेवण्यात येतील आणि हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल,'' असेही फडणवीस म्हणाले.
'औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर होणारच'
ते पुढ म्हणतात की, 'त्या सरकारला सभागृहात बहुमत नव्हतंच, पण कॅबिनेटमध्येही बहुमत नव्हतं. त्यांची काही लोक एका बाजुने बोलली, तर काही लोक दुसऱ्या बाजुने बोलली. त्यामुळे नेमका यांचा निर्णय काय होता, हे पूर्णपणे अस्पष्ट होतं. आजही कोणाच्या मनात काय आहे, हे समजू शकत नाही. अनेक लोकं दोन्ही बाजुने बोलत आहेत. पण, आमचं निश्चित झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होईल, उस्मानाबादचे नाव धाराशिव होईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यात येईल,'' अशी स्पष्टोक्ती फडणवीसांनी दिली.