Devendra Fadanvis:'युतीमध्ये 25 वर्षे बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?'; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:30 PM2022-01-24T13:30:40+5:302022-01-24T13:33:53+5:30
'तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही.'
मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. आपली 25 वर्षे युतीमध्ये सडली, यांना राजकारणाचा गजकर्ण झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने पहायला मिळाल्या. 25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले, पण 2012 पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. युतीचा निर्णय त्यांनी केला होता, त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात. भाजपासोबतशिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?' असा खोचक सवाल त्यांनी केला.
'तेव्हा तुमचा पक्ष जन्मालाही आला नव्हता'
ते पुढे म्हणाले की, 'हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे. त्यांना आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,' असंही फडणवीस म्हणाले.
'भाषणा पलीकडे सेनेचे हिंदुत्व नाही'
'शिवसेनेने हिंदुत्व शिकवू नये. रामजन्मभूमीसाठी आम्हीच पर्यत्न केले. रामजन्मभूमी आंदोलनात लाठ्या, काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. रामजन्मभूमी, बाबरी हे विषय सोडून द्या, ते तर मोदींनी करुन दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात मंदिर उभं राहत आहे. पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशाला राजनन्मभूमीच्या गप्पा मारता. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय?,' असा सवाल फडणवीसांनी यावेळी विचारला.