Devendra Fadanvis: "महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी"; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:18 PM2022-03-24T17:18:16+5:302022-03-24T17:18:23+5:30
Devendra Fadanvis: ''मुख्यमंत्री म्हणतात, प्रश्न विचारयाल अक्कल कुठे लागते. आम्ही उगाच मागील 22-25 वर्षांपासून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले.''
मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. आजही विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच विषयावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, विंदा करंदीकर यांच्या कवितेतून सरकारला चिमटेही काढले.
विंदा करंदीकरांच्या कवितेतून सरकारला टोला
सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यावरही फडणवीसांनी टोला लगावला. ''छोटे का होईना, पण आज मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले. आज सरकारला राज्यातील नागरिकांचे काही देणे-घेणे नाही. नवीन योजना, प्रकल्पतर आणले नाहीत, उलट सुरू असलेली प्रकल्पही बंद पाडले. दोन वर्षात सरकारकडून काहीच होताना दिसत नाही,'' अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच, ''सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते'', या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून सरकारला टोला लगावला.
'ही तर मद्यविक्री आघाडी'
यावेळी फडणवीसांनी दारू विक्रीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले, ''आमची चुक झाली, आधी आम्हाला वाटायचं की, ही महाविकास आघाडी आहे. पण, नंतर कळालं ही महाविनाश आघाडी, त्यानंतर कळालं ही महावसुली आघाडी आहे आणि आता कळतंय की, ही तर महामद्यविक्री आघाडी आहे. सरकारने दारू विक्रीसाठी अनेक निर्णय घेतले. चंद्रपुरची दारुबंदी मागे घेतली, अनेकांना दारुचे नवीन परवाणे दिले. राज्याला मद्यराष्ट्र करणाचे काम सरकारकडून सुरू आहे.''
'बैठकांमध्ये दारू देणार का?'
फडणवीस पुढे म्हणतात, ''ज्यांनी व्यवसमुक्तीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या अनिल अवचट यांना सरकारने सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी वाईन विक्रीचा निर्णय घेतला. आता आमच्या डोक्यात काही प्रश्न येतात, ड्राय डेला किराणा दुकान सुरू राहणार का? त्यांचे एक नेते म्हणतात, वाईन दारू नाही. मग आता ड्रंक अँड ड्राइव्हमधून वाईन बाहेर येणार का? यापुढे होणाऱ्या बैठकामध्येही चहा-पाण्याऐवजी वाईन सर्व्ह करणार का? सरकार म्हणते, वाईनचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. पण, शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायचा होता, तर मग इतर अनेक गोष्टीचा निर्णय घेता आला असता,'' असं फडणवीस म्हणाले.
'मुख्यमंत्री म्हणतात-प्रश्न विचारायला कुठे अक्कल लागते'
फडणवीसांनी यावेळी मुख्यंत्र्यांच्या एका वाक्यावरही टीका केली. प्रश्न विचारायला अक्कल लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणतात, ''मुख्यमंत्री म्हणाले की, प्रश्न विचारयाल अक्कल कुठे लागते. आम्ही उगाच मागील 22-25 वर्षांपासून सभागृहात लक्षवेधी आणि इतर माध्यमातून प्रश्न विचारत बसलोत. तिकडे संसदेत आणि विधानसभेतही सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्याला संसदरत्न पुरस्कार मिळतो, पण आज आम्हाला समजलं प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही,'' असा टोला फडणवीसांनी लगावला.