शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द, शिंदे-फडणवीस सरकारची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:33 PM2023-02-26T19:33:56+5:302023-02-26T19:34:05+5:30
एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी 2 रुपयांचा चेक मिळाल्याची बाब समोर आली.
मुंबई: उद्यापासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द केल्याची माहिती दिली.
एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने 512 किलो कांदे विक्रीला नेला, पण त्याला अवघ्या 2 रुपयांचा चेक देण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राजेंद्र चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून, हा प्रकार सोशल मीडियावरदेखील प्रचंड व्हायरल झाला. अखेर या प्रकरणाची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि 2 रुपयांचा चेक देणाऱ्या सूर्या ट्रेडर्सचा परवानाच रद्द केला.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राजेंद्र चव्हाण यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा कमी प्रतीचा असतो, त्याला शंभर-दीडशे रुपये भाव असतो. राजेंद्र यांना 512 रुपये मिळाले, पण त्यांना जो चेक मिळाला तो दोन रुपयांचा मिळाला. सिस्टिमनुसार, त्यांच्या चेकमधून वाहतुकीचा खर्च कापण्यात आला. कमी प्रतीचा कांदा असतो, त्यातून वाहतुकीचा खर्च कापता येत नाही. याबाबत 2014 साली नियम करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे', अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.