Devendra Fadanvis: एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 04:06 PM2022-10-09T16:06:15+5:302022-10-09T16:07:09+5:30
'केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही.'
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय दिला. ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देत, आयोगाने चिन्ह गोठवले. या निर्णयावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. 'यापूर्वीही निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतरच अंतिम निर्णय दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, 'केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे तो त्यांच्या कार्यपद्धतीला धरुनच दिला आहे. अंतिम निर्णयाच्या वेळी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) बाजू वरचढ ठरेल अशी अपेक्षा आहे.' दरम्यान, या निर्णयामागे भाजपचा हात असल्याच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'शिवसेनेने नवीन नावे सांगितली आहेत, त्यामागे शरद पवार असल्याचे म्हटले जात आहे.'
'बोलणारे काहीही बोलत असतात. गेल्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आले. त्यांचे 18 खासदार आणि 56 आमदार हे नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आले, आणि आता आमच्यावर आरोप करत आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाणे खणखणीत आहे आणि ते कायम राहील. केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यपद्धतीनुसार निर्णय दिला आहे,' असंही फडणवीस म्हणाले.