"...तर मला आनंद झाला असता", संजय राऊतांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:12 PM2020-07-05T17:12:08+5:302020-07-05T17:16:03+5:30
येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
उल्हासनगर : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कल्याण आणि उल्हासनगरचा दौरा केला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत भाजपावर अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची काळजी करू नये, तर त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. सध्या कोविडच्या रुग्णांची काळजी करण्याची गरज आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. तसेच, ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोविड रुग्णांचे काय होणार, हा प्रश्न विचारला असता तर मला आनंद झाला असता. आता ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर 12 सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"
मुलानं पब्जीच्या नादात उडवले 16 लाख; वडिलांनी धडा शिवण्यासाठी त्याला लावलं 'या' कामाला...
BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा
मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...
कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर