देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'मी पुन्हा येईन'चा अर्थ; शरद पवारांना दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 06:27 PM2019-12-07T18:27:05+5:302019-12-07T18:47:07+5:30
'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दोन गोष्टींची सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात केलेलं भाषण. त्या भाषणामुळे शरद पवारांनी मनं आणि मतं जिंकली, तर 'मी पुन्हा येईन' मधला 'मी' देवेंद्र फडणवीसांना भारी पडला, असं अनेकांचं मत आहे. अलीकडेच, पवारांनीही त्या 'मी'पणावरून फडणवीसांचे कान खेचले होते. मात्र, 'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.
'मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र. माझ्या आसपास कुणीच नाही... हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला 'मी'पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,' अशी टिप्पणी शरद पवार यांनी 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत केली होती. त्याला अत्यंत सविस्तर असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी आज 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात मला माझ्या क्षमता आणि मर्यादा माहीत आहेत. सत्ता कधीच माझ्या डोक्यात गेली नाही, जाऊ शकत नाही. ज्या दिवशी सत्तेवर आलो तेव्हा एकच गोष्ट सांगितली होती की, माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही. चांगलं काम करून नाव कमावणं हेच ध्येय होतं. मी काही फार मोठा माणूस नाही.'
'मी पुन्हा येईन' या वाक्यावरून बरीच टीका झाली. परंतु, ती एक साधी कविता होती. अनेकांना ती फार आवडली. आठ भाषांमध्ये तिचं भाषांतर झालं. ती व्हायरल झाली. त्यात गर्वाचा दर्प नव्हता. मी पुन्हा येईन ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं. पाच वर्षं त्या पदावर बसूनही मी कधी राजा झालो नाही, सेवक राहिलो. सुट्टी घेतली नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही. जे काम सोपवलं होतं, ते करायाचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याबद्दल मला समाधान वाटतं, गर्व वगैरे विषयच नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
मी कधीही स्वतःच्या नावावर मतं मागितली नाहीत. आमचे नेते नरेंद्र मोदी हेच आहेत. कामाकडे बघून मतदान करा असंच सांगितलं. म्हणूनच जनतेनं आम्हाला मतं दिली. १९९० नंतर कुठल्याही एका पक्षाला १०० च्या वर जागा मिळवता आल्या नाहीत. पण, भाजपानं सलग दोन निवडणुकीत मिळवल्या. भाजपा हरलाय असं चित्र निर्माण केलं जातंय. पण, जनतेच्या मनात आम्हीच होतो. लोकांनी ज्यांना नाकारलं ते एकत्र आल्यानं आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.
My interaction on @zee24taasnewshttps://t.co/PLyQHKmYiC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2019