देवेंद्र फडणवीसांनी जखमी मराठा आंदोलकांची मागितली माफी, पवारांच्या आरोपांना दिलं असं उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:29 PM2023-09-04T15:29:00+5:302023-09-04T15:29:37+5:30
Devendra Fadnavis: जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने क्षमा मागितली आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने क्षमा मागितली आहे. तसेच या प्रकरणाचे आदेश मुंबईतून, मंत्रालयातून आले अशी शंका व्यक्त करत फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या शरद पवार यांनाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत इथे चर्चा झाली. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे उपोषण सुरू आहे त्यातील मागण्यांसंदर्भातही इथे सखोल चर्चा झाली. जालन्यामध्ये उपोषण सुरू आहे. तिथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला गेला. खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. तसेच अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही.
मी आधीही पाच वर्षे गृहमंत्री होतो. त्या काळात आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची दोन हजार आंदोलनं झाली. परंतु कधीही आम्ही बळाचा वापर केलेला नाही. तसेच आताही बळाचा वापर करण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे ज्या निष्पाप नागरिकांना बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्याप्रति मी शासनाच्या वतीने क्षमायाचना करतो. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या संदर्भातील दोषींवर कारवाई करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
मात्र या घटनेचं राजकारण व्हावं हे देखील योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. विशेषत: जाणीवपूर्वक लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले. वरून आले. अशा प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याच प्रयत्न झाला. लाठीमार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार एसपी आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यासाठी कुणाच्या आदेशांची गरज नसते, हे या नेत्यांनाही माहिती आहे. मग माझा सवाल आहे की, ज्यावेळी निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा तसा आदेश कुणी दिली होता. तो मंत्रालयातून आला होता. मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा ते आदेश कुणी दिले. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते का, तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही. त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे. मात्र त्याचं राजकारण करून सरकार हे करतंय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र लोकांनाही हे राजकारण सुरू आहे, हे कळतंय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.