देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:57 PM2024-12-04T13:57:39+5:302024-12-04T14:03:22+5:30

विरोधकांनी 'मी पुन्हा येईन' घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. 

Devendra Fadnavis Chief minister swearing-in ceremony invitation goes viral; Look, who will swear with them? | देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?

मुंबई - महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मांडण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. या घडामोडीतच आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली असून त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

या निमंत्रण पत्रिकेत काय लिहिलंय?

महाराष्ट्र शासनाकडून मान्यवरांना पाठवण्यात आलेल्या या निमंत्रण पत्रिकेत असा मजकूर आहे की, श्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान, फोर्ट,मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित राहावे ही विनंती, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून ही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. 

५ वर्षांनी ते पुन्हा आले!

देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. 

आझाद मैदानावर कोण घेणार शपथ?

५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्याशिवाय शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री शपथ घेतील. अद्याप मंत्रिमंडळाची यादी अंतिम झाली नसून रात्री उशिरापर्यंत ती फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिघांच्या शपथविधीसोबत १०-१५ नेते शपथ घेऊ शकतात असं बोललं जात आहे. 

पुढची वाट अपेक्षापूर्तीसाठी संघर्षाची 

बूथ कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वोच्च पदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी बसवले. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदी बसण्याचा मान दिला. ७२ तासांसाठी का होईना तांत्रिकदृष्ट्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो होतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षातील कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली, सन्मान मिळाला. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो. त्याशिवाय ज्यांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीत महाराष्ट्रात तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. ताकद निर्माण केली ते अमित शाहा यांचे आभार मानतो. भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेते, पक्षाचे कार्यकर्ते त्याशिवाय इतर राज्यातील कार्यकर्त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील भाजपाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. तुम्ही आहात म्हणून मी इथं आहे. तुम्ही नसता तर मी इथं नसतो. पुढची वाट अपेक्षापूर्तीसाठी  संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एकदिलाने सर्व मित्रांना सोबत घेऊन काम करायचे आहे. आपण मोठं उद्दिष्ट घेऊन राजकारणात आलोय. केवळ पदांसाठी राजकारणात नाही. येत्या काळात ४ गोष्टी मनासारख्या, ४ गोष्टी मनाविरुद्ध होतील तरीही एका मोठ्या उद्दिष्टाने आपण काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांना दिला. 

Web Title: Devendra Fadnavis Chief minister swearing-in ceremony invitation goes viral; Look, who will swear with them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.