"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:58 AM2024-10-01T07:58:55+5:302024-10-01T08:04:54+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं.

Devendra Fadnavis clarified on Union Minister Nitin Gadkari statement regarding Ladki Bahin Yojana | "सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis on Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी उद्योजकांशी संवाद साधताना सरकारी अनुदानाबाबत महत्त्वाचे विधान केलं होतं. सरकार म्हणजे विषकन्या आहे. सबसिडीच्या भरवशावर राहू नका, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. तसेच यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत अनुदानाचे पैसे तिथे द्यावे लागत असल्याचेही म्हटलं होतं. गडकरी यांच्या या विधानानंतर विरोधकांनी सरकारची स्थिती अडचणीत असल्याचे म्हटलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ही योजना बजेटच्या बाहेरची नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्योजक आणि गुंतवणूकदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. तसेच राजकीय पक्षांबाबतही गडकरींनी भाष्य केलं. सरकारच्या भरवशावर राहू नका. सरकार ही विषकन्या असते, असं नितीन गडकरींनी म्हटलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला होता. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यावे लागत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. गडकरी यांच्या विधानावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीका देखील केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“नितीन गडकरींची ती स्टाईल आहे. ही योजना बजेटच्या बाहेरची नाही. आमच्या सर्व योजना बजेटमध्ये आहेत. त्यामुळे पगार किंवा इतर योजनांकरता अडचण नाही. हे सर्व पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले आहेत. आता विरोधकांच्या पोटात जोरात दुखायला लागल्याने ते रोज संभ्रम निर्माण करतात. काहीही बंद होणार नाही. सर्व चालणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

"कोणत्याही पक्षाचे सरकार असो. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी यांच्या लफड्यात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा काही भरवसा नाही. माझ्या मुलाने सांगितले की ४५० कोटी रुपये अनुदान मिळालं आहे. मुलाने विचारलं की अनुदान कधी मिळणार. त्याला म्हटलं देवाला प्रार्थना कर. कारण काही भरवसा नाही की अनुदान मिळणार की नाही," असं नितीन गडकरींनी म्हटलं.

त्यानंतर बोलताना गडकरींनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. "सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यामुळे त्यांनाही अनुदानाचे पैसे त्या योजनेसाठी द्यावे लागत आहेत. यामुळे अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही," असे नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis clarified on Union Minister Nitin Gadkari statement regarding Ladki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.