मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:05 PM2024-08-27T14:05:51+5:302024-08-27T14:07:40+5:30

इंदापूर मतदारसंघातील महायुतीत राजकीय चढाओढीमुळे भाजपाला आणखी एक मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.  

Devendra Fadnavis close aid BJP Leader Harshvardhan Patil meets Sharad Pawar; A shock to BJP in Indapur Constituency | मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?

पुणे - माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र याठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपा लढणार की राष्ट्रवादीच लढवणार हा संभ्रम असताना भाजपातील इच्छुक हर्षवर्धन पाटील यांनी पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरात कागल येथील समरजितसिंह घाटगे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील अशी चर्चा होती. त्यातच आज हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर येत्या निवडणुकीला सामोरे जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. इंदापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या रुपाने शरद पवार पर्यायी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये गर्व्हनर कौन्सिलची बैठक होती. या बैठकीला विजयसिंह मोहिते पाटील, विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत त्यांना इंदापूर विधानसभेत तुतारी चिन्हावर लढण्यासाठी तयार केले जात आहे अशी चर्चा होती. त्यामुळे आजच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात काय राजकीय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. अर्धा तास बंद खोलीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. 

दरम्यान, कोल्हापूरातील कागल तालुक्याचे भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबरला शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केल्यास इंदापूरात महायुतीला तगडं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Devendra Fadnavis close aid BJP Leader Harshvardhan Patil meets Sharad Pawar; A shock to BJP in Indapur Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.