शिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भातील सल्ल्याने राजकारण तापलं; फडणवीस म्हणाले - हा बाळासाहेबांचा पक्ष नाही
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 1, 2020 09:39 PM2020-12-01T21:39:25+5:302020-12-01T21:40:44+5:30
फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत ऑनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते.
नागपूर - शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी भाजप नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर शिवसेना आता 'वोट बँकेचे राजकारण' करत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत ऑनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले, "ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. या मुद्द्यावर ते नेहमी लढत राहिले आणि शिवेसना, बाळासाहेबांनी 'सामना'त लिहिलेल्या त्यांच्या लेखांच्या आणि वक्तव्यांच्या बरोबर उलटे कार्य करत आहे."
एका प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "आम्ही मुस्लीम समाजाकडे कधीही व्होट बँक म्हणून पाहिले नाही. तसेच आम्हाला तुष्टीकरणाचे राजकारण नकोय. मुस्लीम समाजही 'सबका साथ, सबका विकास'चा भाग आहे."
अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर... -
यासंदर्भात, नितेश राणे यांनीही, ट्विट करत म्हणाले, "आहो पक्षप्रमुख.. खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे.. नाहीतर "हो मी नामर्द आहे” असं तरी ?'', असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
भाजपाच्या टीकेनंतर पाडुरंग सकपाळ यांनी केला खुलासा -
अजानच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा केला आहे. पांडुरंग सकपाळ म्हणाले, मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर युथ' नावाच्या संस्थेच्या सदस्यांनी अजानची खुली स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. खुली स्पर्धा केल्यास नियमांची पायमल्ली होईल हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात असे सूचवले. अशा शुभेच्छा देताना माझ्या मनात धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टींचे राजकारण करण्यात येऊ नये."