अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 15:00 IST2020-02-23T14:50:05+5:302020-02-23T15:00:06+5:30
सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार या सरकारच्या काळात वाढला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.

अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका
मुंबई : राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. तर याच वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. "अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू असल्याचा" खोचक टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, अल्पसंख्याक मतांसाठी राजकीय पक्षात स्पर्धा लागल्या असून याचे मला आश्चर्य वाटते. तर राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने केंद्र सरकारने ट्रस्ट तयार केला. तसेच मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, त्यामुळे ट्रस्ट तयार करण्याचा प्रश्नच येत नसून, शरद पवार हे विसरले असल्याचा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.
तर जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण, आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. तसेच सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार या सरकारच्या काळात वाढला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.