जितेंद्र आव्हाडांचे 'ते' विधान रामभक्तांचा अपमान करणारं; देवेंद्र फडणवीस संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:04 PM2023-04-22T18:04:02+5:302023-04-22T18:06:39+5:30
महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील असं विधान करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.
मुंबई - रामनवमी, हनुमान जयंती केवळ दंगली घडवण्यासाठीच आहेत का? असं वाटतं हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. मुंबईत राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलत होते. मात्र आव्हाडांच्या या विधानावरून आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात हिंदू सणांचा अपमान केल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - जितेंद्र आव्हाड
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांचे हे विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामनवमी असेल वा हनुमान जयंती अत्यंत शांतपणे साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभू श्रीरामाप्रती, हनुमान यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. ही श्रद्धा उत्सवानिमित्त व्यक्त केली जाते. त्यामुळे दंगलीकरता अशाप्रकारे रामनवमी, हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणं हे समस्त समाजाचा, रामभक्तांचा अपमान आहे. हे विधान अतिशय चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील असं विधान करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही ठरवलंय का दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? हा प्रश्नही आम्हाला उपस्थित होतो. अशा परिस्थितीत नेत्यांनी संवेदनशील वागले पाहिजे आणि संवेदनशील बोलले पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणे योग्य नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालेत की काय? कधी नव्हे तेवढे वातावरण खराब झालंय. येणारे वर्ष हे जातीय दंगलीचे असेल. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही. नोकऱ्या देऊ शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही त्यात सर्वात सोप्पं म्हणजे धार्मिक सोहळे करा, त्या सोहळ्यातून मते जमा करा आणि नाही जमले तर आग लावा. दंगली कशा प्लॅन केल्या जातात याचा मी साक्षीदार आहे. मी स्वत: उभं राहून अनुभव घेतलाय. मला दंगल कुणी समजवू नये असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.