'वेदांतावरुन विरोधकांची नौटंकी सुरू, कंपनीचा आधीच निर्णय झाला होता', फडणवीसांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:18 PM2022-09-26T18:18:27+5:302022-09-26T18:19:50+5:30
'वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल.'
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरू आहे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, 'राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक आणू', असेही म्हणाले.
यावेळी फडणवीस म्हणाले, 'माझी फायनान्स विभागासोबत आढावा बैठक झाली. पुढच्या काळात अतिरिक्त साधण संपत्ती करून मोठी गुंतवणूक कशी आणता येईल, ते आम्ही पाहणार आहोत. जीडीपीच्या साडेतीन-चार टक्के गुंतवणूक कॅपिटल इनव्हेसमेंट म्हणून झाली पाहिजे किंवा एकूण बजेटच्या 25 टक्क्यापर्यंत कशी नेता येईल, त्याबद्दल विचार सुरू आहे,' असे ते म्हणाले.
वेदांतावरुन विरोधकांना टोला
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. 'वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरू आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांता कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला समजलं होते की, ते गुजरातला जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र लिहिली, स्वतः जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज देऊ, चांगली जागा देऊ, असेही सांगितले होते. पण, त्यांचा निर्णय आधीच झाला होता. आता महाविकास आघाडी नौटंकी करत आहे. पण, वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल,' असे फडणवीस म्हणाले.
विविध योजना राज्यात येणार
फडणवीस पुढे म्हणाले की, 'विविध राज्यात तिथल्या सरकारांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या गोष्टी पाहण्यासाठी मंत्री जाणार आहेत. त्या योजना महाराष्ट्रात कसाप्रकारे आमलात आणता येतील, त्याबाबत विचार सुरू आहे. जसे, गुजरात सरकारने एक डॅशबोर्ड सुरू केला आहे, ज्यात राज्यातील सर्व प्रकल्पांबाबत सर्व माहिती दिली जाते. तसाच डॅशबोर्ड महाराष्ट्रात करता येईल का, यावर विचार सुरू आहे. तिकडे, हरियाणामध्येही परिवार पहेचानपत्र योजना आहे, याशिवाय विविध राज्यात ज्या चांगल्या योजना सुरू आहे, त्या राज्यात कशा सुरू करता येतील, यावर आम्ही विचार करत आहोत,' अशी माहिती फडणवीसांनी दिली.