अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 05:25 PM2021-01-29T17:25:34+5:302021-01-29T17:25:40+5:30
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक लाख रुपयांचा चेक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होत आहे. यानिमित्त एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होत आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सर्व या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून तब्बल 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये, अशा स्वरुपात निधी संकलित केला जात आहे. निधी दिल्यानंतर, संबंधित व्यक्तीला पावती तसेच मंदिर आणि श्रीरामांचे एक चित्र देण्यात येते.
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही अयोध्येला जाणार -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान ते अयोध्येला जाणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला जायला हवे, मी देखील जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिद्धीला गेले आहेत.