...ही तर महाराष्ट्रासोबत गद्दारी; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 10:58 AM2019-12-02T10:58:39+5:302019-12-02T11:30:00+5:30
माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानावरुन फडणवीसांचा समाचार
मुंबई: केंद्रानं दिलेलं ४० हजार कोटी रुपये वाचवता यावेत यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं नाट्य रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ही महाराष्ट्राची गद्दारी असल्याचं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर शरसंधान साधलं आहे.
Bjp mp @AnantkumarH says @Dev_Fadanvis as CM for 80 hours, moved maharashtra's 40000 cr Rs to center ? This is treachery with maharshtra , महाराष्ट्र के साथ गद्दारी है @Officeof UT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीत असेल, असं हेगडे काल म्हणाले. 'मुक्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी ८० तासांत राजीनामा दिला. त्यांनी हे सगळं नाट्य का घडवून आणलं? बहुमत नसतानादेखील ते का मुख्यमंत्री झाले? त्यांनी असा निर्णय का घेतला? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,' असं हेगडे म्हणाले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या ८० तासांच्या मुख्यमंत्रिपदामागचं राजकारण आणि अर्थकारण सांगितलं. 'काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर होईल याची फडणवीसांना कल्पना होती. त्यामुळेच संपूर्ण नाट्य रचण्यात आलं आणि मुख्यमंत्री होताच १५ तासांमध्ये फडणवीसांनी ४० हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,' असं हेगडे यांनी सांगितलं. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
फडणवीसांना काही दिवसांसाठी मुख्यमंत्री करुन केंद्राकडे निधी परत पाठवायचा ही योजना भाजपानं आधीच तयार करुन ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहोचवायचे होते, त्याठिकाणी पाठवून दिले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. योजना यशस्वी करुन फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचवला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.
भाजपासोबत एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपापासून वेगळी झाली. तर भाजपा-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवारांना धक्का देत भाजपाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. अगदी, सकाळी-सकाळी शपथविधीही घेण्यात आला. त्यामुळे मी पुन्हा येईन, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.