देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:52 PM2023-08-02T12:52:36+5:302023-08-02T12:53:16+5:30
समृद्धी महामार्गावर घाईने कामे करा, तातडीने कामे करा असा आदेश शासनाचा आहे असा आरोप काँग्रेसने केला.
मुंबई – समृद्धी महामार्गावर शहापूरनजीक गर्डर कोसळून २० कामगार ठार झालेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. समृद्धी महामार्ग लोकांसाठी जीवघेणी समृद्धी झालीय. लोकांचा जीव दररोज जातोय. समृद्धी महामार्ग काही काळासाठी बंद करा. ज्या काही उपाययोजना करायच्या त्या आधी करा. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न जीवघेणं झालंय असं शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाची सूचना आणली होती. त्यात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले की, दर २००-३०० किमी रुग्णवाहिका, फूड प्लाझा असायला हवे होते. पण अद्याप कुठलीही व्यवस्था नाही. पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन केले. पण आता बदल करू शकता. २० लोकांचा जीव जातो. याबाबत सरकार संवेदनशील आहे की नाही. या मृत्यूला जबाबदार कोण? या रस्ता बांधकामात काही त्रुटी आहे का? समृद्धी महामार्गाचे ऑडिट करून घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या समोर आल्या पाहिजे. तोवर समृद्धी महामार्ग बंद करावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
तर लोकसभा निवडणुकीपूर्वी समृद्धीचे उद्धाटन करावे अशी घाई सरकारला झाली. त्यामुळे किती लोकांचे प्राण जातायेत? ज्या कंपन्यांना कामे दिली आहेत त्यांना अनुभव होता का? या प्रकाराचे काम कंपनीला आणखी कुठे दिले आहे का? २० कर्मचाऱ्यांचे नाहक बळी जातात. या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर घाईने कामे करा, तातडीने कामे करा असा आदेश शासनाचा आहे. मृत्यूचे तांडव समृद्धी महामार्गावर सुरू आहे त्याला जबाबदार कोण? १०० दिवसांत ९०० जण दगावले. राज्यातील जनतेचा जीव घेऊन समृद्धी होत असेल तर यावर शासनाने उत्तर दिले पाहिजे. समृद्धी महामार्गावर जी घटना घडली त्याला जबाबदार कोण? शासन की प्रशासकीय व्यवस्था हे सरकारने सांगावे. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकार काय करणार याचे उत्तर हवे. समृद्धी महामार्गामुळे कुणाची समृद्धी झाली यावर सभागृहात चर्चा होऊ द्या असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले.