लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:38 PM2023-01-14T22:38:56+5:302023-01-14T22:39:24+5:30
Laxman Jagtap: तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते रुग्णवाहिकेतून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत प्रचंड मोठा विजय आम्ही प्राप्त करू शकलो. त्यांनी सातत्याने लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीच प्रयत्न केला. तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते रुग्णवाहिकेतून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या नावाने शहरात विधी महाविद्यालय उभारण्याची आणि महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. १४) सर्व राजकीय पक्षांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शोकसभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लक्ष्मण जगताप हे आपले लाडके आणि उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मोठ्या व्यक्तीची प्रचिती त्याच्या कार्यातून येते. शरीराने फिट असणारा सहकारी मित्र गमावला. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही. आजाराच्या काळातही त्यांच्यात इच्छाशक्ती प्रचंड होती.
भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी मदत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत केली जाईल. त्याचप्रमाणे लक्ष्मण जगताप यांच्या नावाने शहरात विधी (लॉ) महाविद्यालय सुरू केले जाईल. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मण जगताप यांचे नाव दिले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा, सहकार्य करणारा नेता लक्ष्मण जगताप यांच्या रुपाने हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.
आमदार महेश लांडगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.