महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल'- भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:54 AM2024-12-02T00:54:18+5:302024-12-02T00:55:01+5:30

Devendra Fadnavis, Maharashtra Chief Minister : ५ डिसेंबरला शपथविधी होणार हे निश्चित असले तरीही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

Devendra Fadnavis finalised as Maharashtra CM claims senior BJP leader amid Maharashtra Political crisis of Mahayuti Eknath Shinde | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल'- भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचा दावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल'- भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचा दावा

Devendra Fadnavis, Maharashtra Chief Minister : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीला बहुमत मिळाले. एकट्या भाजपाला १३२ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही जोरदार मुसंडी मारली. अशा परिस्थितीत निकाल लागल्यावर राज्यात अवघ्या दोन दिवसात सत्तास्थापना होईल आणि महायुतीचे (Mahayuti) नवे सरकार, मुख्यमंत्री अस्तित्वात येतील, अशी साऱ्यांना खात्री होती. पण राज्याच्या राजकारणाने वेगळेच रंग दाखवले. सुरुवातीला काही दिवस मावळते मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) नाराज असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. परंतु, मी नाराज नसून महायुती ठरवेल त्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर दिल्लीत बैठक झाली आणि मग मुख्यमंत्री जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा जनतेला होती. पण तसे न होता, केवळ शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, अद्यापही गूढच असले तरी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असल्याची त्या बड्या नेत्याने माहिती दिली आहे.

भाजपाचा वरिष्ठ नेता काय म्हणाला?

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक २ किंवा ३ डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआयला दिली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील आपला सोडला, असे पत्रकार परिषदेनंतर बोलले जात होते. पण दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली आणि पडलेला चेहरा काही वेगळीच कहाणी सांगून गेला. त्यानंतर दिल्लीहून परतल्यावर एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी निघून गेले. त्याच दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर केली. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला, याबद्दल साऱ्यांनाच कुतूहल होते. अखेर आज, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावाहून परतल्यावर काय म्हणाले?

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील खासगी निवासस्थानी सुखरुप परतले. ते सातारा जिल्हयातील त्यांच्या दरेगावी गेले हाेते. प्रकृती बिघडल्यामुळे दाेन दिवस ते आपल्या गावीच मुक्कामी हाेते. आता आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे माध्यमांना त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेच्या फाॅर्म्यूल्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची २८ नाेव्हेंबर राेजी नवी दिल्लीमध्ये बैठक झाली हाेती. याच बैठकीनंतर शिंदे हे २९ नाेव्हेंबर राेजी साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले हाेते. आपण नाराज नसून केवळ आराम करण्यासाठी गावी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यांच्या प्रकृती बिघाडामुळे महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईमध्ये एकत्रित हाेणारी बैठक लांबणीवर पडली हाेती. ही बैठक आता लवकरच हाेणार असल्यामुळे याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पदासह अन्यही खात्यांबाबत चर्चा हाेऊन ताेडगा काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Devendra Fadnavis finalised as Maharashtra CM claims senior BJP leader amid Maharashtra Political crisis of Mahayuti Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.