Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!
By यदू जोशी | Published: June 6, 2024 10:56 AM2024-06-06T10:56:49+5:302024-06-06T10:59:03+5:30
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे.
>> यदु जोशी
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षसंघटनेत काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर आता ते खरंच राजीनामा देणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राजीनाम देण्यावर ते अत्यंत ठाम असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. भाजपाचे राज्यातील सगळेच नेते, राजीनामा देऊ नका, म्हणून त्यांची मनधरणी करत असले, तरी स्वतः फडणवीस आपला निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. राज्यातील शिंदे सरकारला आणखी चार महिने राहिले. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागेल. या चार महिन्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहण्यापेक्षा पक्षासाठी झोकून काम करण्याचा मानस फडणवीस यांनी पक्का केल्याचं निकटवर्तीय सांगतात.
पत्रकार परिषदेनंतर काय झालं?
उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. त्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वास्तविक, पत्रकार परिषदेपूर्वी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक प्रदेश कार्यालयातील वरच्या माळ्यावरील सभागृहात झाली. त्या बैठकीत फडणवीस म्हणाले की, राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं मी पत्रपरिषदेत जाहीर करणार आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह दोन नेत्यांनी, असं न करण्याचं मत मांडलं. पराभव काही तुमच्यामुळे झालेला नाही, ही सामूहिक जबाबदारी असते, तुम्ही एकट्याने जबाबदारी घेण्याची गरज नाही, असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण, फडणवीस जबाबदारी स्वीकारण्यावर ठाम राहिले.
त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. 'मी कमी पडलो, महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो', हे त्यांनी जाहीर केलंच; पण सरकारच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती मी पक्षनेतृत्वाला करणार असल्याचं सांगत, उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद सोडण्याचेही संकेत दिले. तेव्हा, बैठकीतील जे नेते पत्रकार परिषदेत बसले होते, तेही अवाक् झाले. अशी काही भूमिका फडणवीस घेतील याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा नेतेमंडळी फडणवीसांना सभागृहात घेऊन गेली. आपण फक्त जबाबदारी स्वीकारणार होतात, मग राजीनाम्याबद्दल कसं काय बोललात, अशी विचारणा या नेत्यांनी केली. तेव्हा फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, "भाजपाला विधानसभा निवडणुकीत ताकद द्यायची असेल, तर माझं बाहेर राहून काम करणं गरजेचे आहे. मी पक्षात राहून काम केलं तर सरकार आणि पक्ष या दोन्हींवर होणाऱ्या आरोपांचं जोरदार प्रत्युत्तर देऊ शकेन. शिवाय, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मला वेळ मिळेल. मंत्रिपद महत्त्वाचे नाही, पक्ष सर्वात महत्त्वाचा आहे." बुधवारी आणि गुरुवारी अनेक फडणवीसांना भेटले, फोनवर बोलले, राजीनामा न देण्याबाबत त्यांना समजावले. मात्र, ते राजीनाम्यावर ठाम आहेत. आता दिल्लीत जाऊन ते पक्षनेतृत्वासमोर कोणती भूमिका मांडतात आणि वरिष्ठ त्यांना कोणता आदेश देतात, याबद्दल उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 5, 2024
मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#BJP@Dev_Fadnavis#DevendraFadnavis… pic.twitter.com/ICvNSdmRqM