Devendra Fadnavis: "सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक", फडणवीसांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 12:39 PM2022-05-08T12:39:06+5:302022-05-08T12:39:54+5:30
Devendra Fadnavis: आज देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याची राजद्रोहाच्या गुन्ह्यातून 12 दिवसांनी जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, राणा दाम्पत्याला दिलेल्या वागणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा(Navneet Rana) यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, "नवनीत राणा यांची तब्येत आता स्थिर होत आहे. परंतू एकूणच ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. एखाद्या गुन्हेगारालाही वागणूक दिली जात नाही, त्याहून वाईट वागणूक रवी आणि नवनीत राणा यांना देण्यात आली. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचंही ते म्हणाले आहेत.
रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी 14 वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. यापुढेही माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे.