"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:36 PM2024-11-02T14:36:49+5:302024-11-02T14:40:21+5:30
शरद पवार यांनी पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दुसरीकडे, निवडणुकीसाठी राज्यात पैशांचा महापूर आल्याचं निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर आलं आहे. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारांवर कारवाई करणे सुरू केले. या कारवाईत शेकडो कोटी रुपये सापडले आहेत. यावरुनच आता राष्ट्रावादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यातील विविध भागांमध्ये तपासणी सुरु करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम देखील सापडली आहे. त्यावरुन आता शरद पवार यांनी भाष्य केलं. बारामती येथे दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते.पण अधिकाऱ्यांचे भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळात असं चालायचं. आता त्यांना तो भास होत असेल. आमच्या काळात तरी असं काही होत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
"या सरकारचं वैशिष्ट्य आहे की, विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे. पण ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं.