"या वयात इतके खोटं बोलायचे नसतं"; शरद पवारांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:52 PM2024-10-29T16:52:33+5:302024-10-29T16:59:47+5:30

बारामतीमध्ये शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis has responded to Sharad Pawar's allegations in Baramati | "या वयात इतके खोटं बोलायचे नसतं"; शरद पवारांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

"या वयात इतके खोटं बोलायचे नसतं"; शरद पवारांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Sharad Pawar : लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेच्या निवडणुकीकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर आज युगेंद्र पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींपासून महाराष्ट्रातल्या उद्योगांपर्यंत भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांचाही शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  महाविकास आघाडी गुजरातची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज बारामतीमध्ये शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशभरातील बेकारी आणि उद्योग-धंद्यांबाबत भाष्य केले. तसेच महाराष्ट्रातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन शरद पवार यांनी महायुती आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं.  इथून पुढे ज्या लोकांनी नोकऱ्या बाहेर नेल्या त्यांना साथ दिली जाणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.

"या वयात इतके खोटे बोलायचे नसते. काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी, ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर एकवर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक एकवर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत. तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल," असं म्हणत फडणवीस यांनी टाटा एअरब, फॉक्सकॉन या प्रकल्पाची उदाहरणं दिली आहेत. 

"टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता. कंपनीने २ मार्च २०२१ लाच हैदराबादेत त्यांच्या प्रकल्पाचे उदघाटन केले होते. पण, आमचे सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी या सर्वांबाबत मी स्वत: मंत्रालयात एक पत्रपरिषद घेतली होती. सर्व मुद्यांचे सविस्तर सादरीकरण केले होते. पण, पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य आहे. असू द्या. एकीकडे ५२ टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी. राज्यातील जनताच याचा निकाल २० नोव्हेंबरला लावेल," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

"महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार होते, ज्यासाठी महाराष्ट्र सरकार जमीन द्यायला तयार होते. तो कारखाना आज गुजरातला गेला आहे. वेदांता फॉक्सकाँनमुळे अनेकांना काम मिळणार होतं, मोदींनी त्यांनाही बोलवून घेतले आणि कारखाना गुजरातला नेला. पंतप्रधान राज्याचा नाही देशाचा असतो, त्यांनी फक्त एका राज्याचा विकास केला. महाराष्ट्राचा उद्योग धंद्यात क्रमांक एक होता तो आता पाचवर गेला आहे. त्यामुळे इथून पुढे ज्या लोकांनी नोकऱ्या बाहेर नेल्या त्यांना साथ दिली जाणार नाही," असं शरद पवारांनी म्हटलं.

Web Title: Devendra Fadnavis has responded to Sharad Pawar's allegations in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.