दिल्लीत देवेंद्र फडणवीसांनी घेतली IPS अधिकाऱ्यांची बैठक; ठाकरे सरकारविरोधात मोठा प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:54 PM2021-09-07T14:54:22+5:302021-09-07T14:56:13+5:30
केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे असा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्याने केला आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं दिसून येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या कथित १०० कोटी वसुली घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु केली. यात प्रथम दर्शनी देशमुखांविरोधात पुरावे आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली. त्यात राष्ट्रवादीनं आता खळबळजनक दावा केला आहे.
मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) म्हणाले की, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत आयपीएस(IPS) अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
तसेच केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल असा इशाराही मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का?
'ईडी'कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का? ईडीकडून सुरू असलेल्या कारवाया केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांनी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार संपूर्ण देशभर व राज्यात अनावश्यक त्रास देण्याचं काम करत आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम आहे असंही पवारांनी म्हटलं आहे.
सरकारमधील कोणकोणते नेते अडचणीत?
अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, एकनाथ खडसे