Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखाच मोर्चाही 'नॅनो', तीन पक्ष येऊनही..."; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:10 PM2022-12-17T17:10:16+5:302022-12-17T17:10:43+5:30
मोर्चासाठी मुद्दाम निमुळती जागा निवडल्याचाही टोला
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, MVA Mumbai Maha Morcha: जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा नॅनो मोर्चा होता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली उडवली.
"महाविकास आघाडीच्या मोर्चासंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता, असे सांगून फडणवीस म्हणाले की, कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात," असा घणाघात फडवीसांनी केला.
सीमावाद वर्षानुवर्षे आहे!
"आज मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही हे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमाप्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. कारण, सीमाप्रश्न निर्माण करणारा काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील," असे त्यांनी विरोधकांनी ठणकावले.
उद्धव ठाकरेंची कॅसेट एक जागी अडकलेली!
"उद्धव ठाकरे मुंबई तोडण्याच्या आरोपाबाबत बोलतात. त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते. ती गेल्या १० वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, कारण, भारताचे संविधान हे सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत," अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.
मोर्चा सपशेल अपयशी ठरला, मुद्दाम निमुळत्या जागेची निवड!
या मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या. पण, त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. आझाद मैदानाचा एक कोपराही त्यांना भरता आला नसता, असे म्हणत मोर्चा अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.