BJP Shiv Sena NCP Alliance: भाजप-राष्ट्रवादीची युतीबाबत चर्चा झाली म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:51 PM2022-04-28T18:51:47+5:302022-04-28T18:53:51+5:30
भाजपाच्या आशिष शेलारांनी केला होता युतीच्या चर्चांबद्दलचा दावा
BJP Shiv Sena NCP Alliance: भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी मोठे विधान केले. २०१७ साली भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा झाली होती. मंत्रीपदेही ठरली होती. मात्र, राष्ट्रवादीने युती करण्यास नकार दिला, असा दावा आशिष शेलार यांनी केला. यावर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली. सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी २०१७ मध्ये भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत केलेले वक्तव्य हा महाविकास आघाडीत संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
"२०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेनेचे सरकार होते आणि २०१७ मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षाचे सरकार बनावे असा कुठलाही संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाला नसताना आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी हे विनोदी वक्तव्य कसे काय केले?" असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला.
"महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त गेल्या अडीच वर्षांमध्ये आले आणि गेले तरीदेखील महाविकास आघाडी भक्कम आहे. राज्य सरकार कारभार प्रामाणिकपणे करीत आहे त्यामुळे हा सरकार अस्थिर करण्याचा अजून एक केविलवाणा व कुटील डाव आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या विरोधात संशयाचे वातावरण निर्माण करणे या एकमेव उद्देशाने आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचे वक्तव्य केले आहे", असे महेश तपासे म्हणाले.
भाजपाचे आशिष शेलार नक्की काय म्हणाले?
"तीन पक्षांचे अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार स्थापन करू, असा भाजपचा प्रस्ताव होता. पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेशी जमूच शकत नाही अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. तर राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला होता. अखेर २०१९ ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली", असा दावा आशिष शेलार यांनी मुलाखतीत सांगितले.