2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:07 PM2023-01-03T18:07:12+5:302023-01-03T18:07:51+5:30

आगामी निवडणुका शिंदे गटासोबत की स्वबळावर, याबद्दलही प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule reveals BJP future planning for 2024 elections | 2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन'

2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन'

googlenewsNext

Elections 2024, BJP Plan: महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वीच सत्तापालट झाला. असे असले तरी सर्वच पक्ष आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहे. अशा वेळी बाळासाहेबांची शिवसेना या एकनाथ शिंदे यांच्या पक्षासह लढून मोठा विजय मिळण्याची आशा भाजपाने व्यक्त केली. याच वेळी, आगामी निवडणुकीत लोकसभेच्या किती आणि विधानसभेच्या किती जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल याबाबतही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले. "भाजपाने बाळासाहेबांची शिवसेना सोबत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे," असे बावनकुळे यांनी सांगितले. आज ते भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

"गेल्या काही महिन्यात राज्यभर ‘धन्यवाद मोदीजी लाभार्थी संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानात मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे पाठवली जात आहेत. फ्रेंड्स ऑफ बीजेपी सारख्या उपक्रमातून भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी सहमत असणार्‍या तसेच पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास असणार्‍या समाजातील मान्यवरांना पक्ष संघटनेशी जोडले जात आहे. संपूर्ण राज्यभर बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत," असा भाजपाचा सविस्तर प्लॅन असल्याचे त्यांनी सांगितले.

"मोदी सरकारने गरीब कल्याणच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशाला सामर्थ्यशाली, समृद्ध बनवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांना यश मिळत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोदी सरकारप्रमाणेच विविध समाजसघटकांच्या कल्याणाच्या योजना आखत आहे. अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महविकास आघाडी सरकारने जनकल्याणाची कोणतीच कामे केली नाहीत. ‘फेसबुक लाईव्ह सरकार’ जावून आता कार्यक्षम सरकार आले आहे. या सरकारने शेतकर्‍यांना 7 हजार कोटींची मदत केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घेतले आहेत", असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

"केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिनाच्या सरकारमुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवली जातील, त्याचबरोबर संघटन मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासह 45 पेक्षा अधिक जागा तर विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य करू," असा विश्‍वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule reveals BJP future planning for 2024 elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.