व्यासपीठावरच देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:26 PM2023-10-26T16:26:12+5:302023-10-26T16:26:47+5:30
मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो असं फडणवीस म्हणाले.
शिर्डी – महाराष्ट्रातील ५० टक्के भागात दुष्काळ आहे. जोपर्यंत या परिसरात पाणी पोहचत नाही तोवर शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. आमच्याकडे आराखडा तयार आहे, त्या प्रकल्पांना केंद्राने मदत केली महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्र सरकारच्या निधीची मागणी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील ५० टक्के असा भाग आहे जो दुष्काळग्रस्त आहे. ज्याठिकाणी पाऊस जास्त पडत नाही. पाणी नाही. या भागाला जोपर्यंत पाणी पोहचवत नाही तोवर महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. केवळ तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकतो. पश्चिमी नद्यांचे पाणी जे समुद्रात जाते, ते गोदावरीत आणून अहमदनगरपासून संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू शकतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत या योजनेची पूर्ण व्यवस्था, संपूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे. प्रकल्पही तयार केलाय. त्याचसोबत विदर्भात वैनगंगा नदीतून वाहणाऱ्या १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी आपण दुष्काळग्रस्त भागातून नळगंगापर्यंत आणू शकतो. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आपण कायम दुष्काळमुक्त करू शकतो. तुम्ही आशीर्वाद द्या, याआधीही केंद्राने मदत केली आहे आणखी थोडी मदत या प्रकल्पांना केंद्र सरकारने केली तर आमच्या पिढीने महाराष्ट्रात दुष्काळ पाहिला परंतु येणारी पिढी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
९ वर्षात ३० हजार कोटी केंद्राने दिले
मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो. पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन आम्हीदेखील ज्याप्रकारे शेतकऱ्यांना निधी दिला जातो तसे महाराष्ट्रानेही निर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. निळवंडे सारखा प्रकल्प सुरुवात माझ्या जन्माच्या आधी झाली होती. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय म्हणजे कित्येक वर्ष लोकांनी हा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहिली. २०१६-१७ मध्ये आम्ही निळंवडे प्रकल्पाला चालना दिली, विशेष निधी उपलब्ध करून दिला. राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे त्यावेळी विरोधात होते. परंतु त्यांनी सहकार्य केले त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्याचेही उद्घाटन झाले आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.