जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 09:06 AM2024-10-12T09:06:22+5:302024-10-12T09:08:05+5:30
एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या उमेदवारीची घोषणा केली.
Devendra Fadnavis on Girish Mahajan : विधानसभा निवडणुकांसाठी काहीच दिवस उललेले असताना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांच्या पत्नीची उमेदवारी थेट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. पण २०२९ मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेवू शकतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखण्या जोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्या नंतर ते पूर्ण झाल्या शिवाय ते स्वस्त बसत नाहीत. गिरीश महाजन हे साधेसुधे नसुन अस्सल हिर्यांसारखे आहेत. जामनेरकर हे पारखी आहेत आणि त्यांची पारख जामनेरकरांना आहे. तसेच गिरीश भाऊ महाजन हे फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.