Devendra Fadnavis Maharashtra Budget: अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही भलताच अर्थ काढायचा; फडणवीसांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:30 PM2023-03-09T15:30:54+5:302023-03-09T15:31:40+5:30
Maharashtra Budget Updates: अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे म्हटले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आणि महिलांना केंद्रात ठेवून विविध योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे म्हटले होते.
‘पंचामृत’ मध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी; महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास; भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास; रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा; पर्यावरणपूरक विकास हे असल्याचे फडणवीस म्हणाले. हे पाचही मुद्दे झाल्यानंतर यातील पंचामृताकडे वळतो असे फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी सभागृहातील गंभीर वातावरण निवळण्यासाठी एक वक्तव्य केले. मी शब्द जरा जपून वापरतोय, चुकून अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही तुम्ही भलताच अर्थ काढायचा, असे म्हटले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचे नाव अमृता असल्याने त्यांनी ही लिंक जोडली.
अर्थसंकल्पात महत्वाचे काय...
गेल्या काही वर्षांपासून बळीराजा संकटात आहे. पिक विम्याची रक्कम भरूनही त्याला संकटे आल्यावर विमा मिळत नव्हता. यामुळे विमा नको पण विमा कंपन्यांना आवरा अशी परिस्थिती झाली होती. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तोडगा काढला आहे. राज्यातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे.
- राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
- 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.