शिंदे आणि फडणवीसांमध्ये मध्यरात्री सव्वातास बैठक, मोहित कंबोजही उपस्थित; चर्चांना उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:32 AM2022-07-02T09:32:55+5:302022-07-02T09:34:10+5:30
राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई-
राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत. यातच काल रात्री उशिरापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीसाठी भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रविवारी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याच्या स्ट्रॅटजीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खातेवाटपासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याची शिवसेना खासदारांची मागणी, पण ठाकरेंकडून केराची टोपली
देवेंद्र फडणवीस रात्री जवळपास १२ वाजून ४७ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. त्यानंतर रात्री १ वाजून ५० मिनिटांनी फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर निघाले. या बैठकीबाबत एकनाथ शिंदे यांना प्रसार माध्यमांनी विचारलं असता अशा भेटी आता रोजच होत राहणार, असं म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चा अजून गुलदस्त्यात आहे.
फडणवीस निघाल्यानंतर काही वेळानं एकनाथ शिंदे देखील बाहेर पडले आणि गोव्याला निघाले. गोव्यात थांबलेल्या बंडखोर आमदारांसोबत शिंदे चर्चा करणार आहेत. शिंदे सर्व आमदारांना आज मुंबईत घेऊन येणार असल्याचं बोललं जात आहे.