"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:12 PM2024-06-05T18:12:22+5:302024-06-05T18:16:08+5:30
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: "सध्याच्या स्थितीत जर देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाजूला झाले, तर त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतील. महायुतीची सुरळीत वाटचाल होण्यासाठी फडणवीसांनी सरकारमध्ये राहणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा मार्ग अजिबातच स्वीकारता कामा नये," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी रोखठोक मत व्यक्त केले. राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत.
"निकाल पाहिल्यावर दु:ख होणे, वाईट वाटणे हे देवेंद्र फडणवीसांसाठी स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की यश-अपयश ही सर्वांची जबाबदारी आहे. कुण्या एकट्यावर ठपका ठेवणे मला योग्य वाटत नाही. महायुतीचं जहाज सध्या वादळामध्ये सापडलं आहे. अशा वेळी जहाजाचे कॅप्टन्स आहेत त्यांनी बाजूला होणे योग्य नाही. सगळ्यांनी एकत्र राहून विधानसभेची निवडणूक एकत्रित लढली पाहिजे," असे भुजबळ म्हणाले.
"देशातील अनेक ठिकाणी NDA मध्ये नुकसान झाले आहे, मतदान कमी झाले आहे, पण केवळ त्याची जबाबदारी केवळ फडणवीसांवर ठेवणे योग्य नाही. त्यांनी तसा विचार करू नये. तुमच्यासोबत आमचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे अपयश धुवून काढायला हवे हे महायुतीपुढील आव्हान आहे," असे सूचक विधान भुजबळांनी केले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं. आम्ही एका निवडणुकीत हार-जीत झाल्याने खचून जाणारे लोक नाही. फडणवीसांनी भावना नक्कीच व्यक्त केल्या असतील. पण आम्ही टीम म्हणून काम करतच राहणार. मी नक्कीच देवेंद्र फडणवीसांशी बोलेन. जो निकाल आला आहे ती सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. कुणा एकट्याची जबाबदारी नाही, त्यामुळे मी फडणवीसांशी नक्कीच चर्चा करणार आहे," असे मत एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या निर्णयावर व्यक्त केले होते.