Sindhutai Sapkal: “वात्सल्यसिंधू सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:20 AM2022-01-05T11:20:14+5:302022-01-05T11:21:02+5:30
Sindhutai Sapkal: देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
मुंबई: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असून, माईंच्या मुलांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळातील अनेकांनी सिंधुताई सकपाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्या गेलेल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. अनेक संस्था त्यांनी उभारल्या. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान आहे. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे. त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे, याची आज प्रकर्षाने आठवण होते आहे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील सिंधुताईंचे योगदान महत्त्वपूर्ण
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही सिंधुताई यांच्या निधानावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी दु:खद आहे. अनेक अनाथ मुलांची माय झालेल्या सिंधूताईंचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सिंधूताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत नारायण राणे यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरु होते. त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
The life of Dr Sindhutai Sapkal was an inspiring saga of courage, dedication and service. She loved & served orphaned, tribals and marginalised people. Conferred with Padma Shri in 2021, she scripted her own story with incredible grit. Condolences to her family and followers. pic.twitter.com/vGgIHDl1Xe
— President of India (@rashtrapatibhvn) January 4, 2022
ज्येष्ठ समाजसेविका व 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 4, 2022
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करणे खूप कमी जणांना शक्य होते, त्यापैकी एक सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. pic.twitter.com/T1sXQVb118
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 4, 2022
'बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला...असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! pic.twitter.com/rpNiDBDR8S
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022
अनाथांचीच नव्हे; तर साऱ्यांचीच ‘माई’ असणाऱ्या सिंधुताई वात्सल्याचे प्रतीक होत्या. मानवतेचा, समाजसेवेचा वसा घेतलेल्या सिंधुताईंचं कार्य समाजाला कायम दिशादर्शक ठरेल. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना विनम्र श्रद्धांजली! pic.twitter.com/JBkqgcZE5K
— Vinod Tawde (@TawdeVinod) January 4, 2022
ज्येष्ठ समाजसेविका आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनाला वेदना झाल्या. सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य महिला सबलीकरण व हजारो अनाथांच्या पोषणासाठी समर्पित केले. अलिकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. pic.twitter.com/q38u6q8ZDD
— Sunil Tatkare (@SunilTatkare) January 4, 2022
हजारो अनाथ लेकरांची माय पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏#Padmashri#सिंधुताई_सपकाळ#Sindhutai_Sapkalpic.twitter.com/FWUGGktWIL
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 4, 2022
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 4, 2022
आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/XgLwAMvlGZ
माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 4, 2022
महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/L5huoQgpMQ
पद्मश्री सेवाव्रती सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाल्याचे समजले. अतिशय खडतर संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐 pic.twitter.com/jVjJhx3sct
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 4, 2022
ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले. अनाथ मुलांची मायेची सावली हरपली. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#भावपूर्ण_श्रद्धांजली#सिंधू_ताई_अमर_रहेpic.twitter.com/XkmaEWQol5
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 4, 2022