"मी नालायक आहे ना, मग..."; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:31 PM2024-08-31T18:31:16+5:302024-08-31T18:32:48+5:30

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिले आहे. 

Devendra Fadnavis' new challenge to Manoj Jarange, targets to uddhav Thackeray Sharad pawar and nana patole | "मी नालायक आहे ना, मग..."; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

"मी नालायक आहे ना, मग..."; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

Devendra Fadnavis on Manoj Jarange patil : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटलांनीही निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय पारा दिवसेंदिवस चढू लागला आहे. अशात अंतरवाली सराटी झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचे आमदार पाडू, असे विधान केले. त्या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.  

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिआव्हान दिले आहे. 

"राजीनामा देईन, राजकारणातून निवृत्त होईन"

मनोज जरांगेंच्या विधानावर फडणवीस म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू. सरकार कोणाचे आहे; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार. सरकारचे प्रमुख कोण आहेत, एकनाथ शिंदे. सरकारमध्ये अधिकार कोणाला असतात, मुख्यमंत्र्यांना असतात. म्हणून मी परवा सांगितले की, मराठा समाजाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय माझ्यामुळे अडलाय, असे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तर त्याक्षणी राजीनामा पण देईन आणि राजकारणातून निवृत्तही होईन. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की, त्यांच्या संपूर्ण कार्याला माझे समर्थन आहे."

"खरे म्हणजे मराठा समाजासाठी जे माझ्या कार्यकाळात झाले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केले. एक लाख मराठा समाजाचे तरुण आज उद्योजक झाले. सारथी तयार केले, शेकडो तरुण यूपीएससीमध्ये आयएएस, आयपीएस झाले. एमपीएससीमध्ये वेगवेगळ्या पदावर निवडले गेले. डॉक्टरेट मिळाली. सगळ्या योजना मी सुरू केल्या आणि त्यांचे बळकटीकरण शिंदेंनी केले. अनेक नवीन योजना शिंदेंनी सुरू केल्या. तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे मी आमदार पाडेन", अशी नाराजी फडणवीसांनी व्यक्त केली. 

देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना काय दिले आव्हान?

याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "जरांगे पाटलांचे म्हणणे काय आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या. एका मिनिटासाठी आपण असे समजू की देवेंद्र फडणवीस नालायक व्यक्ती आहे. माझे त्यांना आव्हान आहे की, लोकसभेमध्ये ज्यांना त्यांच्यामुळे मदत मिळाली ते महाविकास आघाडीचे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून त्यांनी आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास तयार आहोत, असे लेखी घ्यावे", असे चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना दिले. 

"मी नालायक आहे ना, मग या तिघांकडून त्यांनी घेऊन दाखवावे. या तिघांना त्यांनी म्हणावे की, आता तुम्हाला आमची मदत पाहिजे किंवा मदत केली आहे. तुम्ही आम्हाला हे लिहून द्या की, आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायला तयार आहोत", असे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंना म्हणाले आहेत.

Web Title: Devendra Fadnavis' new challenge to Manoj Jarange, targets to uddhav Thackeray Sharad pawar and nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.