पक्षाचा ‘तो’ निर्णय योग्य होता....; उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस मनमोकळे बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:52 PM2023-07-03T18:52:52+5:302023-07-03T18:55:18+5:30
मविआ सरकार जनतेने निवडून दिले नव्हते. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - आमच्या सरकारला १ वर्ष होत असताना आज मागे वळून पाहिले तर तेव्हा मला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली तेव्हा मनात खटकलं होतं. लोक काय म्हणतील, जो मुख्यमंत्री राहिला आहे तो उपमुख्यमंत्री बनतोय. सत्तेसाठी किती लालसा असेल. परंतु १ वर्षांनी माझ्या पक्षाने घेतलेला निर्णय योग्य होता असं वाटते. कारण जे काम तुम्ही सरकारमध्ये राहून करता ते सरकारबाहेर राहून करता येत नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही गेल्या १ वर्षात अनेक परिवर्तनवादी निर्णय घेतले. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी एकही प्रकल्प राबवला नाही जो त्यांनी केला आहे असं म्हणता येईल. आमचे सरकार आल्यानंतर सर्व विकासकामांना गती मिळाली. कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर रोड या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. मुंबईचं नवीन एअरपोर्ट पुढील वर्ष सुरू होईल. आम्ही १ वर्षात १० मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू केले. केवळ १ वर्षात २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. मविआ सरकारने जे निर्णय अडवले होते ते निर्णय आम्ही घेतले. हे वर्ष निर्णयांचे होते असं त्यांनी सांगितले. ANI च्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच मविआ सरकार जनतेने निवडून दिले नव्हते. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुका लढवल्या. त्यावेळी जनतेने १७० बहुमत दिले. परंतु ज्यांना बहुमत मिळाले नाही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आमच्यासोबत आले त्यांनी बाळासाहेब, नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले होते. शरद पवार, राहुल गांधींचे फोटो लावून निवडून आले नव्हते. सुप्रीम कोर्ट अपात्रतेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंकडून १३ मागण्या करण्यात आल्या त्यातील एकही मागणी मंजूर करण्यात आली नाही. लोकांनी निवडून दिलेले सरकारच पुन्हा सत्तेवर आले. राष्ट्रवादी सरकारमध्ये शिवसेना आमदारांना स्कोप देत नव्हती असा आरोप आमदारांचा होता. त्यामुळे ते आमदार आमच्यासोबत आले असं फडणवीसांनी सांगितले.
ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र पिछाडीवर गेला
भारतीय रेल्वेने कोविड काळात सर्वात जास्त काम केले. भारतातील रस्ते मोठ्या प्रमाणात कोविड काळात बांधले गेले. भारतात गुंतवणूक आली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र नंबर १ होता. आमच्या राज्यात गुंतवणूक जास्त होती. आमचे सरकार गेल्यानंतर पहिल्यावर्षी गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक नंबर वन झाले. परंतु आमचे सरकार आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर १ झाला. उद्धव ठाकरेंच्या काळात केंद्राकडे राज्य सरकारचे योगदान दिले जात नव्हते. भांडणामुळे विकासकामे रखडवली. मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ २ वेळा मंत्रालयात गेले हे शरद पवारांनी म्हटलं. अशाप्रकारे सरकार चालत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.