कुराणच्या 'आयत' लिहिलेल्या चादरी जाळल्या नाही; नागपूर हिंसाचाराबाबत फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:46 IST2025-03-19T18:44:19+5:302025-03-19T18:46:52+5:30
'समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नाही.'

कुराणच्या 'आयत' लिहिलेल्या चादरी जाळल्या नाही; नागपूर हिंसाचाराबाबत फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis on Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(19 मार्च 2025) नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत महत्वाची माहिती दिली आहे. 'नागपूर हे नेहमीच शांतताप्रिय शहर राहिले आहे. 1992 च्या जातीय तणावाच्या काळातही शहरात दंगल झाली नाही. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. ते कोणत्याही कबरीत लपले तरी त्यांना कबरीतून बाहेर काढून कारवाई करू,' असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.
कुराणच्या आयत जाळल्या नाही...
कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. याबाबत सीएम फडणवीस म्हणाले की, 'कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असून, खोट्या बातम्यांमुळे हा हिंसाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपुरात हिंसाचार पसरवण्यास जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाऊ नये, अशा सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नागपूरची शांतता आणि सद्भावना कोणत्याही किंमतीत बिघडू दिली जाणार नाही,' असा पुनरुच्चार त्यांनी केला.
#MaharashtraAssembly | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis says, "The investigation is underway in the Nagpur violence case...There is peace in the city at present...There have been no riots here in the past several years...Some people did all this deliberately... The… pic.twitter.com/zZqSx5bbKw
— ANI (@ANI) March 19, 2025
पोलिसांनी 51 आरोपींची नावे दिली
नागपूर हिंसाचारप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरच्या प्रतीवरून अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. एफआयआरमध्ये 51 आरोपींची नावे आहेत. 10 पथके इतर आरोपींचा शोध घेत आहेत. एफआयआरनुसार, जमावाने प्रक्षोभक घोषणाबाजी केली आणि खोट्या अफवा पसरवल्या. 'पोलिसांना दाखवून देवू', 'कोणत्याही हिंदूला सोडणार नाही', अशा घोषणा दिल्यामुळेच हिंसाचार भडकल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Police conduct combing operation in Bhaldarpura area
— ANI (@ANI) March 19, 2025
Rahul Madne, DCP Nagpur Police, says, "We have identified the houses from where stones were pelted at us. Combing operation is underway and the accused will be arrested. From here, we've taken… pic.twitter.com/dpug3R0bbn
कशी आहे नागपुरातील परिस्थिती?
नागपुरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही संचारबंदी कायम आहे. नागपुरात परिस्थिती सामान्य असली तरी, पोलीस खबरदारीच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी रात्री पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. नागपूर पोलीस परिसराचा आढावा घेत आहेत. कर्फ्यू उघडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.