पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 08:22 PM2024-07-01T20:22:29+5:302024-07-01T20:22:54+5:30
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
Devendra Fadnavis on Pankaja Munde : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांची नावे आहेत. आता पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावे जाहीर झाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेषत: आमच्या सर्वांचा आग्रह होता की, पंकजा ताईंना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जावी. हाय कमांडने आमची मागणी मान्य केली आणि त्यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींवर जोरदार टीका
यावेळी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याबद्दल फडणवीसांना विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले, "राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले, हिंदूंचा अपमान केला, आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे आणि संसदेत हिंदूंची माफी मागावी", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पालखी सोहळ्याबाबत काय म्हणाले?
"ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि पंढरीची वारी ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेला एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातला आनंदाचाच क्षण असतो. मला विश्वास आहे,जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहेत, तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच फडकत राहिल आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडीत राहील," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
असे आहे विधानसभेचे सध्याचे गणित...
सध्या विधानसभेत भाजपचे 103 आमदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 37 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष अपक्षांचे मिळून एकूण 201 आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे 37, ठाकरे गट 15, शरद पवार गट 13, शेकाप आणि अपक्ष मिळून 67 आमदार आहेत. सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 आमदार निवडून येऊ शकतात.