देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:03 AM2022-07-01T07:03:56+5:302022-07-01T07:04:34+5:30

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली.

Devendra Fadnavis out of power to Deputy Chief Minister, Picture changed in a few hours | देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

googlenewsNext

मुंबई : विरोधी पक्षनेत्याच्या दमदार भूमिकेत राहिलेले देवेंद्र फडणवीस सायंकाळी मुख्यमंत्री होणार असे निश्चितपणे वाटत असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपण मंत्रिमंडळात असणार नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, नंतर काही वेळातच अतिशय नाट्यमय घटना घडल्या आणि फडणवीस यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली. गेल्या चार दिवसांत भाजपचे पक्षश्रेष्ठी, फडणवीस आणि शिंदे यांच्यात सातत्याने चर्चा होत होती. चार दिवसांपूर्वी अमित शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बडोद्याला जी चर्चा झाली त्यात शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शहा यांनी सुतोवाच केले व मोदी यांच्याशी चर्चा करून नंतर अंतिम निर्णय कळविला जाईल, असे सांगितल्याची माहिती आहे.

चर्चेतल्या थिअरीज... -
फडणवीसांनी पत्रपरिषदेत आपण मंत्रिपदी असणार नाही, असे जाहीर करायचे, नंतर पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश द्यायचे व त्यांनी ते स्वीकारायचे ही स्क्रिप्ट ठरली होती.

फडणवीस यांनी ते मंत्रिमंडळात राहू इच्छित नाहीत असे आधी सांगितले, त्याला पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली. मात्र, पक्षाचे आमदार या प्रकाराने नाराज असल्याचे लक्षात आल्याने फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याची गळ घातली गेली की, सगळे आधीपासूनच ठरले होते या दोन थिअरींची चर्चा आहे.

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रतीची निष्ठा व सेवाभावच दर्शविते. मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करीत आहे. ज्या पक्षाने मला राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचविले त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोपरी आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 

Web Title: Devendra Fadnavis out of power to Deputy Chief Minister, Picture changed in a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.