छत्रपती उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ; फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 07:10 PM2018-02-24T19:10:17+5:302018-02-24T19:31:03+5:30

जे उदयनराजेंच्य नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात.

Devendra Fadnavis praises Udayan Raje on his birthday in Satara | छत्रपती उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ; फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव

छत्रपती उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ; फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव

Next

सातारा: छत्रपती उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते महाराष्ट्राच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. साताऱ्याचे खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले आज त्यांचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त आज साताऱ्यात जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांच्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी म्हटले की, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी ते आमच्यासाठी एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे आहेत. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या कारभाराच्या पद्धतीकडेही लक्ष वेधले. जे उदयनराजेंच्य नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली. परंतु, एरवी उदयनराजे म्हणजे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही तमा न बाळगता आवाज उठवणारी व्यक्ती असल्याचे फडणवीसांनी म्हटले. 

उदयनराजे मला अनेकदा भेटत असतात. त्यावेळी ते स्वत:साठी काही न मागता साताऱ्याच्या विकासाचीच मागणी करतात. आमच्या चंद्रकात पाटलांनी यापैकी काही मागण्या पूर्णही केल्या आहेत. आम्ही सगळे त्यांच्यावर छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच उदयनराजे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची केलेली मागणी आज त्यांच्या वाढदिवशी मान्य करत असल्याची घोषणाही यावेळी फडणवीसांनी केली. 

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर असताना उदयनराजेंना शरद पवारांसमोर मिठी मारली. राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरु झाली आहे. आजच्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण,  आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

Web Title: Devendra Fadnavis praises Udayan Raje on his birthday in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.