विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:48 PM2023-02-02T23:48:48+5:302023-02-02T23:49:11+5:30
अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. परंतु अमरावतीत भाजपाला कडवी झुंज द्यावी लागली. नागपूरमध्ये भाजपा पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला. औरंगाबादेतही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्यात तर काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत. त्यावर आम्ही चिंतन करू. त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज ज्या निवडणुका झाल्यात त्यात मला आनंद आहे. कोकणची जागा बऱ्याच कालांतरानंतर भाजपा जिंकली आहे. त्याचवेळी नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही. नागपूरची जागा शिक्षक परिषदेने लढली. कोकण, नागपूर या दोन्ही जागा शिक्षक परिषद लढायच्या. या दोन्ही जागा भाजपाला लढवायला द्याव्यात असा आग्रह आमचा होता पण कोकणाचा आमचा आग्रह त्यांनी मान्य केला. नागपूरमध्ये आम्ही सुचवलं होतं की, शिक्षक परिषद या जागेवर निवडून येऊ शकणार नाही. भाजपा या जागेवर निवडून येऊ शकेल. त्यांचा आग्रह असल्याने शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला आम्ही समर्थन दिले. पण त्याठिकाणी ती जागा निवडून येऊ शकली नाही. आम्हाला त्याचे दु:ख आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत त्यामुळे नक्कीच त्याचा विचार हा पार्टी करेल. त्याठिकाणी अवैध झालेल्या मतांची संख्या मोठी आहे. त्यात आमच्या उमेदवाराला पडलेल्या अवैध मतांची संख्या जास्त आहे. त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. मराठवाड्यात पक्षाने चांगल्यारितीने ही जागा लढवली याचं समाधान आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
दरम्यान, नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करेन. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही सत्यजित तांबे अतिशय भरघोस मतांनी निवडून आलेत. त्यांनादेखील माझ्या शुभेच्छा आहेत असं फडणवीसांनी सांगितले. त्याचसोबत आगामी काळात कसबा, चिंचवड २ पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपाची तयारी सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे या दोन्ही पोटनिवडणुका आम्ही जिंकू असंही फडणवीस म्हणाले.
LIVE | Media interaction in #Mumbaihttps://t.co/GmXovukKuP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2023