"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:58 PM2024-11-15T12:58:07+5:302024-11-15T12:59:38+5:30
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बटेंगे तो कटेंगे घोषणेवर टीका करताना कन्हैया कुमार यांनी अमृता फडणवीसांवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.
Devendra Fadnavis Amruta Fadnavis Kanhaiya kumar: काँग्रेस नेते कन्हैया कुमारने अमृता फडणवीस यांच्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. कन्हैया कुमारच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. जेव्हा माझ्याविरोधात काहीच सापडलं नाही, तेव्हा माझ्यावर वैयक्तिक हल्ले सुरू केले. माझ्या पत्नीविरोधात यांची ट्रोल आर्मी आहे. यांनी कपभर पाण्यात बुडून मरायला पाहिजे, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी कन्हैया कुमार यांना दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अमृता फडणवीसांवरून होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
कन्हैया कुमारांनी आपत्तीजनक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, तुम्ही जेव्हा धर्मयुद्धाबद्दल बोलत असता, तेव्हा तुमची पत्नी रील्स बनवते. वैयक्तिक राजकारण खूपच होत आहे, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
पाच वर्ष माझ्या पत्नीने आणि मी हे सहन केलंय -देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बघा मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण मागील पाच वर्ष मी आणि माझ्या पत्नीने हे सगळं सहन केलं आहे. पाच वर्षात हे माझ्याविरोधात काहीच काढू शकले नाही. माझ्या विरोधात सर्व तपास यंत्रणा लावल्या. माझ्या केसांपासून नखांपर्यंत यांनी माझा सर्व तपास केला. पण, माझ्याविरोधात यांना काहीच मिळालं नाही."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "जेव्हा माझ्याविरोधात काहीच सापडलं नाही. तेव्हा यांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ले सुरू केले. माझ्या पत्नीविरोधात यांची ट्रोल आर्मी आहे. ज्या प्रकारचे आरोप करतात, सभ्य व्यक्तीने बघितले तर त्यालाही लाज वाटेल. पण, मी माझ्या पत्नीलाही सांगितलं आहे की, आपण राजकारणात आहोत. आपल्याला संयम ठेवावा लागेल."
यांनी कपभर पाण्यात बुडून मेलं पाहिजे; फडणवीस संतापले
"खोट्याला आयुष्य नसतं. आणि सत्य त्रस्त होऊ शकतं पण पराभूत होत नाही. त्यामुळे मी म्हणतो की, महिलांबद्दल बोलतात... ज्या प्रकारे वर्तन यांनी केलं आहे. ज्या प्रकारे माझ्या पत्नीचे मीम बनवणे, तिच्याबद्दल घाणेरड्या गोष्टी सांगणे, या सगळ्या गोष्टींबद्दल लाज वाटली पाहिजे. कपभर पाण्यात बुडून मेलं पाहिजे. अरे लढायचंच आहे, तर समोरून लढा. हे कोणत शिखंडीचं युद्ध तुम्ही लढत आहात. पण, या प्रकरणात मी खूप संयमी आहे. मला लढाई कळते आणि मी यांना पराभूत करतो", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
#WATCH | On Congress leader Kanhaiya Kumar's 'Deputy CM's wife makes reels on Instagram' statement, Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says "...'Sharam aani chahiye, chullu bhar paani mein doob marna chahiye'...I am not surprised by this. My wife and I have suffered for the… pic.twitter.com/ym7uhM0WDB
— ANI (@ANI) November 15, 2024
कन्हैया कुमार काय म्हणालेले?
नागपूरमध्ये प्रचारसभेत बोलताना कन्हैया कुमार म्हणालेले की, "जर हे धर्मयुद्ध आहे, तर जो नेता धर्म वाचवण्यावर भाषण देत आहे, त्याला विचारा की, तुमची मुलं-मुलीही धर्म वाचवण्याच्या युद्धात सहभागी होणार आहेत का? हे कसं शक्य आहे की, जनतेने धर्म वाचवायचा आणि नेत्यांच्या मुला-मुलींनी परदेशात शिक्षण घ्यायचं? धर्म वाचवण्याची जबाबदारी जनतेची कशी असू शकते, जर उपमुख्यमंत्र्यांची पत्नी इन्स्टाग्रामवर रील बनवत असेल?", अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली होती.