राऊत म्हणाले मुंबईचा 'दादा' शिवसेनाच, फडणवीसांनी थेट 'गिधाडा'ची उपमा दिली!; काय म्हणाले वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:30 PM2022-02-09T14:30:28+5:302022-02-09T14:30:58+5:30
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज मुंबईचा 'दादा' शिवसेनाच असल्याचं विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून राऊतांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
पणजी-
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज मुंबईचा 'दादा' शिवसेनाच असल्याचं विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून राऊतांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करताना गिधाडाची उपमा दिली आहे. 'शेर कभी गिदड की धमकी से डरा नहीं करते', असा टोला लगावत फडणवीसांनी राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे.
"मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतोय. त्यांना माहिती आहेच मला काय सांगायचे आहे. आम्ही तुमच्या घरात घुसरो तर तुम्हाला नागपुरात जाणंही मुश्किल होईल", असा इशारा संजय राऊत यांनी दिला. त्यावर फडणवीसांनी राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
"संजय राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधानं केली पाहिजेत हे त्यांना चांगलं माहित आहे. त्यांना जे काही मांडायचं असेल ते त्यांना कोर्टात मांडावं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत नेहमीच त्यांच्याकडे फोकस कसा राहील यासाठी अशी विधानं करत असतात, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीशी युती नाहीच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यानंतर भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहूनच काम करेल. आम्ही युतीने नव्हे तर बहुमतानं सरकार स्थापन करू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.