“एक व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, ते PM होऊ शकतात का?”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:14 PM2024-04-24T19:14:39+5:302024-04-24T19:18:41+5:30

Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, संजय राऊतांच्या विधानाचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

devendra fadnavis replied sanjay raut statement about uddhav thackeray interested for pm post in rally for lok sabha election 2024 | “एक व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, ते PM होऊ शकतात का?”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

“एक व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, ते PM होऊ शकतात का?”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच पुन्हा एकदा पंतप्रधानपदावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. याच विधानाचा आधार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला.

पंतप्रधानपदासाठी वाद नाहीत. आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते जर पंतप्रधानपदासाठी इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी देशातील अन्य अनेक नेते इच्छुकांच्या रांगेत आहेत. ममता बॅनर्जी आहेत, अखिलेश यादव आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत. यांच्यासह अनेक चेहरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. कोणाचे नाव घेणे गुन्हा आहे का, आमच्या पक्षनेत्याचे आम्ही नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. या विधानाचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.

ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का?

एकाने घोषित करुन टाकले की, देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांची एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणी जाईल का? कुणीच जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अमरावतीतील सभेत फडणवीस बोलत होते. 

दरम्यान, राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी आहे. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोक नेता मानायला तयार नाहीत. परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचे नेतृत्व करु शकत नाहीत. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे ऐकणार नाहीत, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
 

Web Title: devendra fadnavis replied sanjay raut statement about uddhav thackeray interested for pm post in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.