राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:45 PM2023-11-20T18:45:46+5:302023-11-20T18:47:23+5:30

संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून झळकते. ते किती नैराश्येत आलेत हे दिसून येते असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis replied to Sanjay Raut on Chandrasekhar Bawankule's casino photo | राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.."

राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.."

नागपूर - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील फोटो ट्विट केल्यानं खळबळ माजली आहे. एका रात्रीत साडे तीन कोटी रुपये कॅसिनोत उधळल्याचा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यात भाजपानेही आदित्य ठाकरे यांचे काही फोटो शेअर केलेत. त्यामुळे भाजपा-ठाकरे गटात फोटोवरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. आता या संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संजय राऊतांची विकृत मानसिकता झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून झळकते. ते किती नैराश्येत आलेत हे दिसून येते. चंद्रशेखर बावनकुळे कुटुंबासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. ते रेस्टॉरंट होते, त्याठिकाणीच कॅसिनो होते. तो अर्धवट फोटो टाकलेला आहे. पूर्ण फोटो टाकला असता तर त्यात त्यांची पत्नी, मुलगी, नातू सगळेच दिसतील. नैराश्येतून त्यांची मानसिकता इतकी ढासळली आहे की ती कुठेतरी थांबली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.तसेच १०० टक्के हा वैयक्तिक हल्ला आहे. यापेक्षा आणखी किती वाईट पातळी असू शकते, की तुम्ही मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता ही राजकारणाची पातळी खाली नेण्याचा प्रकार आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांचा इशारा 

माझ्यावर कुणीही टीका केली तरी मी व्यक्तिगत टीका करत नाही. सुरुवात कोणी केली हे त्यांना कळायला हवं. आम्हीही हात घालू शकतो. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी, सीबीआय असेल पण आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी,सीबीआय आहे. साडे तीन कोटी रुपये डॉलर्समध्ये दिलेत. नाना पटोले अत्यंत योग्य बोलतायेत. उगाच टोलझाड सोडलीय ती बंद करा अन्यथा दुकान बंद करावे लागेल. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळे पोलादी भट्टीतून अन्याय सहन करून बाहेर पडलेली माणसं आहोत. दिवाळीत साडे तीन कोटी खर्च केले. आनंद मिळतोय तर घ्यावा पण महाराष्ट्रातील परिस्थिती काय, शेतकरी आत्महत्या करतायेत. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्हाला कळायला हवे असा टोला संजय राऊतांनी लगावला. 

त्याचसोबत महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर असताना कॅसिनोत साडे तीन चार कोटी एका रात्रीत उधळले गेले.आम्ही मर्यादेचे उल्लंघन करत नाही.आम्ही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु सुरुवात तुम्ही केलीय आणि अंत आम्ही करू. जानेवारीपर्यंत तुम्हाला कळेल. तुम्ही जास्त आवाज करू नका. आमच्याशी वाद घालू नका. तुम्ही जास्त आवाज केला तर माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत. तुम्हाला तुमचे दुकान बंद करावे लागेल असा इशारा राऊतांनी दिला आहे.  

Web Title: Devendra Fadnavis replied to Sanjay Raut on Chandrasekhar Bawankule's casino photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.