"आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या"; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "अशा घटनांवेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:56 PM2024-08-20T15:56:51+5:302024-08-21T17:15:26+5:30
दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.
Badlapur School Case : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकणातील पीडितांच्या पालकांची तक्रार घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालकांना ११ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. आरोपीला अटक झाली असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाल्याचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवी असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आठवड्याभरानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. यावरुनच विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना विरोधी पक्ष संवेदनाहीन असल्याचे म्हटलं आहे.
मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे. मात्र, मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही. कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर लेकींना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारण - देवेंद्र फडणवीस
"विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो याचे दुर्दैव वाटते. संवेदनाहीन अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे. किमान ज्यावेळी अशा घडतात तेव्हा राजकारण करायाचं नसतं. विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. तेच राजकारण बाहेर येत आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. अशा संवेदनशील घटना घडतात तेव्हा त्यांनी राजकीय न वागता त्याठिकाणी जनतेला काय देता येईल आणि न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारची वागायचं असतं. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना राजकारण करायचं आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.