वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:26 PM2020-02-21T20:26:48+5:302020-02-21T20:35:53+5:30
वारिस पठाण यांच्या 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी', या विधानावरुन राजकीय वातावरण तापले आहे.
नागपूर : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते आणि भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी', या विधानावरुन राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वारिस पठाण यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
वारिस पठाण यांचे विधान निंदनीय आहे. खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम राष्ट्रामध्ये कुणी बोलले असते, तर तेथे काय अवस्था झाली असती? हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यायला हवे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याचबरोबर, भारत हा सहिष्णू देश आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे. मात्र, हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला जर हिंदू समाजाची दुर्बलता कुणी समजत असेल, तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे अशाप्रकारचे विधानया ठिकाणी खपवून घेतले जाणार नाही, हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात आंदोलने सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारे विधान केले आहे. आम्ही 15 कोटी आहोत. पण 100 कोटींना भारी पडू, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे.
वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले. दरम्यान, वारिस पठाण यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
ओवेसींनी केली बोलती बंद!
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्यावर कारवाई केली आहे. वारिस पठाण यांना माध्यमांवर बोलण्याची बंद घालण्यात आली आहे. जोपर्यंत पार्टी परवानगी देत नाही, तोपर्यंत वारिस पठाण सार्जजनिक ठिकाणी भाषण करणार नाहीत. तसेच, औरंगाबादमधील एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस पठाण यांच्याकडून , याप्रकरणी स्पष्टीकरण मागणार असल्याचे सांगितले आहे.
15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन - संजय राऊतांचा टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही वारिस पठाण यांचा समाचार घेतला. त्यांच्यामागे 15 जण आले, तरी मी सत्कार करेन, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले, 'कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. 15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 जण येऊ द्या, तरीही मी त्यांचा सत्कार करेन.'
मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण...
वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर मनसेकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. मनसेने याबाबत ट्विट करुन म्हटले की, 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल अशा शब्दात इशारा दिला आहे. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भाषणातील जुना व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, जर काही वेडवाकडे या महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडीन काढेन असे त्यांनी म्हटले आहे.