Devendra Fadnavis: "CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा आगामी काळात मनपा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल", फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 08:42 PM2022-08-17T20:42:47+5:302022-08-17T20:45:02+5:30
भाजपाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांचे जल्लोषात स्वागत व सत्कार
Devendra Fadnavis: भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात स्वागत केले. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. "चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजपा आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल", असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर ५० युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या २५ लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच नंबर वनचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे", अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली.
मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल बोलताना आशिष शेलार यांनीही मुंबई पालिकेत भाजपाचा महापौर बसवण्याच्या विचाराचा पुनरूच्चार केला. मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार यावेळी आशिष शेलार यांनी व्यक्त केला.